गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना ७५८८१६८९३९ या नंबरवर कळवा

धृपद

धृपद -
हा एक वीररस प्रधान गीतांचा प्रकार मानला गेला आहे. केव्हापासून धृपद या प्रकाराची निर्मिती झाली किंवा प्रचार झाला हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे पण ग्वाल्हेरच्या राजा मानासिंह तुंबर याने ह्या प्रकारास खूपच लोकप्रियता मिळवून दिली. आणि त्यानंतर या गायकीचा प्रचार संपूर्ण देशात झाला. अकबर बादशहाच्या कारकिर्दीत धृपद हा गायनाचा प्रकार अत्यंत उंच शिखरावर पोहोचला होता. अकबराच्या दरबारात तानसेन सारखे विद्वान ध्रुपदगायक पण होते.
धृपदमध्ये बांधलेल्या रचनेचे काव्य हे उच्च प्रतीचे असते. पूर्वकालीन धृपद रचनेत अस्ताई, अंतरा, संचारी आणि आभोग असे चार भाग असत. पुढे पुढे धृपद गायनात फक्त दोनच म्हणजे अस्ताई व अंतरा असे विभाग राहिले. धृपदात तालाला विशेष महत्त्व दिले जाते व गायकी प्रकारात आलाप व बोलातानांना जास्त महत्त्व असते. ह्या प्रकारात ताना फारश्या घेतल्या जात नाहीत. परंतु जेव्हढ्या घेतल्या जातात त्या सर्व गमक युक्त असतात. धृपद गीत ईशस्तवन, युद्धातील पराक्रम किंवा परमेश्वराची लीला इ.चे वर्णन आधाळून येते. ह्यात शृंगार रसांच्या रचना क्वचितच आढळून येतात. खंडारबानी, नोहारंबानी, डागुराबानी आणि गोबरहारबानी अशी ह्या गायकीचे चार प्रमुख घराणी होती.
जो राग गायचा असेल त्याची आलापी नोम तोम या शब्दांचा आधार घेऊन सुरात केली जात असेल आणि त्यातून संपूर्ण रागाचा नियमानुसार अविष्कार केला जात असे. नोम तोम करते समयी कुठलाही ठेका धरला जात नसे. आलापी संपल्यानंतर त्या रागातले एक तालबद्ध गीत गायले जात असे आणि त्यातच दुप्पट, तिप्पट, आड, कुवाड इ. लयींचे आकर्षक प्रकार करून गीताची समाप्ती केली जात असे. धृपद गायकीतील मुख्य ताल म्हणजे चौताल, सुराफाक्ता, तेवरा, झंपा इ. जशी जशी ख्याल गायकीला लोकप्रियता मिळत गेली तशी तशी धृपद गायकीला उतरती कळा लागली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you very much for your valuable feedback. Visit again